एका जंगलात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावला आहे. या तरुणीची हत्या (Murder) इतकी निर्घृणपणे करण्यात आली होती, की शवविच्छेदन करणारे आणि हा रिपोर्ट पाहाणारेही हैराण झाले. मृतदेहावर अनेक ठिकाणी चाकूचे वार आढळून आले. तर, कपडेही फाटलेले होते. पोलिसांनी बलात्काराच्या (Rape) अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मृत तरुणीच्या प्रियकरासह तिघांना अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) असून सरोजनी नगर परिसरातील गहरू जंगलात तरुणीचा मृतदेह आढळला होता.
या तरुणीच्या प्रियकराचं नाव कैफ असल्याचं म्हटलं जात आहे. या कैफच्या मित्रांना तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते, मात्र तिनं नकार दिल्यानं तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्यावर एक-दोन वेळा नाही तर, तब्बल 24 हून अधिक वेळा चाकूनं वार करण्यात आले. चाकू तुटून तरुणीच्या हाडांमध्ये अडकेपर्यंत ते वार करत राहिले. या आरोपींनी तरुणीला दोरीनं बांधून तिच्या पाठीवर, पोटावर आणि गळ्यावरही वार केले. तिच्या गळ्यामध्ये या आरोपींना दोरी बांधली आणि तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच तिथून फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची मोहम्मद कैफ नावाच्या एक मुलासोबत मैत्री होती, या दोघांचं फोनवर बोलणंही होत असे. कैफदेखील सरोजनी नगरमध्येच राहायचा. 12 जूनला तरुणीनं त्याला सांगितलं, की तिचे वडील घरी नाहीत आणि आईदेखील गावी गेली आहे. हे माहिती होताच कैफनं तिला शहराबाहेर फिरायला जाण्यासाठी मनवलं.
पोलिसांनी सांगितलं, की आरोपी कैफ तिला गहरू जंगलात घेऊन गेला. इथे आधीच त्याचे दोन मित्र उपस्थित होते. नशेत असणाऱ्या या तिघांनी आधी तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या मृतदेहापासून काही अंतरावर दारुची आणि पाण्याची बाटली, पान मसाल्याचे पाकीट आणि ग्लास आढळून आले होते. मृत मुलगी लखनऊपासून तब्बल 80 किलोमीटर दूर असलेल्या सीतापुर येथील रहिवासी होती. तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं, की त्यांची मुलगी 12 जून रोजी संध्याकाळी घरातून गायब झाली होती. यावेळी तिचे वडील कामावर गेले होते आणि आईदेखील घरी नव्हती.













