मुंबई : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा परिणाम पाहता राज्यात लाॅकडाऊन वाढविण्यात आला होता. या लाॅकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आणखी रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे .येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केली जातील, परंतु, त्यामध्ये नागरिकांना फारशा सवलती मिळणार नाहीत.
सध्या राज्यातील करोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पहिल्यांदा हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत वाढले. आता ही मुदत संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे.
काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी अजूनही काही जिल्ह्यांत बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतेक मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज्यात निर्बंध लावण्याआधी सक्रिय रूग्णांची संख्या ७ लाखापर्यंत पोहोचली होती. मात्र आता ती ४ लाख ७५ हजारापर्यंत खाली आली आहे.
अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)
१) किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11
३) भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11
4) फळे विक्री- सकाळी 7 ते 11
5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11
6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11
7) पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11
8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11
9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11
10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11
लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी पुढे म्हटलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील. 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.
राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.