Akshay and Twinkle : देशात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे अतिशय आक्राळविक्राळ रुप घेतले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड, औषध आणि ऑक्सिजन सिलेंडर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे अनेकांचा तडफडून मृत्यू झाला आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही पुढे येऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती स्वतः ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
आमच्याजवळ एकुण 220 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर
ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर करत लिहिले, ‘लंडनच्या दोन डॉक्टर्सनी 120 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी आणि अक्षयने 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे एकूण 220 कंसन्ट्रेटरचं दान केले जाणार आहे. एकत्र येऊन योगदान करुयात.’
रजिस्टर्ड NGO ची माहिती द्या
ट्विंकल खन्नाने त्याआधी एका पोस्टमध्ये लिहिले होते, ‘कृपया मला रजिस्ट्रेशन झालेल्या आणि विश्वासार्ह एनजीओंची माहिती द्या. जे 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटरचे (प्रति मिनिट 4 लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे) वाटप करण्यास मदत करतील हे कंसन्ट्रेटर थेट लंडनवरून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील.’
Akshay and Twinkle यांनी वेळोवेळी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मागील वर्षी अक्षयने कोरोनासाठी पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी रुपये दान केले होते. याशिवाय त्याने काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या एका संस्थेला एक कोटी रुपये दान केले आहेत. गौतम गंभीरची ही संस्था गरीबांसाठी जेवणाची सोय करते.