नवी दिल्ली : १८ वर्षांवरील नागरिकांना १ मे पासून कोरोनावरील लस दिली जाणार असून यासाठीच्या नोंदणीकरण प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, कोविन ॲपवरून नोंदणी करताना अजूनही ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण होत असल्याचा मेसेज येत असल्याने गोंधळ आहे.
१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांनी ही लस मोफत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाकडे मोठ्या आशावादी दृष्टीने पाहिले जात आहे. व्यापक प्रमाणात लसीकरणाची मोहीम हाती घेतली जात असली तरी लसीच्या पुरेशा साठ्याबाबत अनेक राज्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे.
लसीचे पुरेसे साठे तसेच लसीचा दर यावरून कित्येक राज्यांनी आधीच आपले हात वर केलेले आहेत. या राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड यांचा समावेश आहे. १८ ते ४५ वयोगटातील २.९० कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनी मात्र वेळेत लसीकरण मोहीम पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने लस निर्मितीला हायजॅक केले असून आम्ही लस निर्मात्या कंपन्याकडून महागड्या दराने लस खरेदी करू शकत नाही, असे झारखंडच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पंजाब आणि छत्तीसगडच्या आरोग्य मंत्र्यांनीदेखील मोहिमेच्या अनुषंगाने प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.
देशात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणाबाबत गोंधळ उडत आहे. अनेकांनी जन्म वर्ष टाकताच ४५ वर्षांनंतरचेच रजिस्टर करू शकतात असा मेसेज येत आहे. १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
असे करा रजिस्ट्रेशन…
- www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा Register मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा
- OTP आल्यानंतर Vaccine Registraction form भरा,
- schedule appointment वर क्लिक करा. पिन कोड टाका,
- सकाळच्या टप्प्यात की दुपारच्या याबाबत सेक्शन सिलेक्ट करा,
- व्हॅक्सिन सेंटर आणि तारीख निवडा,
- अपॉइंटमेंट बुकवर कन्फर्म करा,
- त्यानंतर व्हॅक्सिनेशन डिटेलचा मेसेज मोबाईलवर येईल.