देशासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये सामान्यांचे कोरोनाशी दोन हात करताना प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, राज्यात मागील एका आठवड्यात कोरोनामुळे २६ एसटी कर्मचाऱ्यांचे निधन झाले. यामुळे एसटी महामंडळातील आतापर्यंत १७८ जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याबाबत तात्काळ वेद्दकीय मदतीसाठी समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे.
राज्यात कोरोनाचे थैमान सुरू झाल्यापासून एसटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची काळजी न करता मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. दरम्यान, राज्यात मालवाहतूक करण्यासाठी एसटीचा वापर करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्वच भागात धान्य पुरवण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांमुळे पार पडले आहे. आपले कर्तव्य बजावत असताना एसटीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत गेली. बाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे; परंतु कर्मचारी स्वत:हून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतरही त्यांची विचारपूस तसेच वैद्यकीय मदतही केली जात नसल्याने एसटी महामंडळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा : पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न, पीपीई कीट घालून दूर केलं कोरोनाचं विघ्न
दरम्यान, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांच्या आसपास होती. यामध्ये १५० च्यावर कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झाले आहे. २६ एप्रिलपर्यंत बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येत आणखी भर पडली व त्यामुळे संख्या ७ हजार २३९ पर्यंत पोहोचली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १७८ झाला आहे. मृतांची आकडेवारी लक्षात घेता गेल्या सहा दिवसांत २६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात शुक्रवारी एसटी महामंडळाने परिपत्रक काढले. बाधित होणाऱ्यांची संख्या पाहता समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे परिपत्रकातून जाहीर करण्यात आले. याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरणही करण्यात येत आहे.