अकोला : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असून त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार अकोला पोलिस नियंत्रण कक्षाच्या एका पोलिस निरीक्षकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे केली आहे. जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन असेही तक्रारकर्त्या निरीक्षकाने म्हटले आहे.
अकोला पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव रोहिदास घाडगे यांनी २० एप्रिल रोजी पत्राद्वारे परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले. सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलिस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती.
अधिक वाचा : “या” कुटूंबांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार शिवाय २ हजाराचा किराणा माल मिळणार
पोलिस महासंचालकांना दिलेल्या या १४ पानांच्या पत्रात घाडगे यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंग हे ठाणे शहर येथे पोलिस १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान कार्यरत होते. तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी कारभार केला. ते भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसेच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे.
अधिक वाचा : स्वतःच्या वडिलांचा मृतदेह गाडीच्या टपाला बांधून मुलगा पोहोचला बैकुंठधाम
सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे बाजार पेठ पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचेही घाडगे यांनी म्हटले आहे. “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन असे घाटगे यांनी म्हटले असून यापूर्वी सुद्धा परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही. आता तरी प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंग यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे घाडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.