अकोला (प्रतिनिधी ): कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आणखी बिकट आहे. कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची अकोल्यात अवैधरित्या विक्री सुरु होती. या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला. याप्रकरणी चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने काही जणांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? घाबरु नका; करा ‘हा’ उपाय
यामध्ये तीन इंजेक्शन एलसीबीने जप्त केले असून त्यामध्ये दुकान मालकासह कर्मचा-याचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या तीन इंजेक्शनची किंमत ७५ हजार रुपयांच्या आसपास असून अजूनही कारवाई सुरू आहे. त्यामुळे अकोल्यात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शन डॉक्टर रुग्णांना देत आहेत. हे इंजेक्शन देतांना शासनाच्या नियमाप्रमाणे दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगितली आहे.
परंतु स्थानिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शनची अव्वाच्या सव्वा दरात अकोल्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तपासात उघड झाले आहे.दरम्यान या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने हे इंजेक्शन विक्री करणाऱ्या बड्या विक्रेत्यापासून ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत लिंक असल्याचे शोधून काढले आहे. सध्या तीनच इंजेक्शन जप्त केले असले तरी, औषधी दुकानांची संख्या एकापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ही राज्यातील मोठी कारवाई असल्याची औषध विक्रेत्यांमध्ये चर्चा आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या पथकाने केली असून अजूनही कारवाई सुरू असल्याचे सांगितले.