नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत अभियानावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधकांच्या रिक्त जागा भरण्याची तयारी केली जात आहे. डीआरडीओमध्ये संशोधकांची आठशेहून अधिक पदे रिक्त आहेत. डीआरडीओ मध्ये या रिक्त जागांची या वर्षी भरती केली जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार डीआरडीओमध्ये वैज्ञानिकांची एकुण ७७७३ पदांपैकी ६९५९ पदे भरण्यात आली आहेत. यातील ८१४ पदे अजुनही रिक्त आहेत. एकुण संख्येच्या दहा टक्के इतकी ही संख्या आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या वर्षी संशोधकांच्या रिक्त पदांच्या भरतीवर लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. नुकतीच अर्थ मंत्रालयाने ४३४ पदांच्या भरतीसाठी सहमती दिली आहे. बाकीच्या पदांच्या भरतीसाठीची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डीआरडीओच्या देशभरात एकुण ५२ प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रयोगशाळेत या वैज्ञानिकांची भरती केली जाणार आहे. डीआरडीओकडून संरक्षण क्षेत्रासाठीच्या साहित्या सोबतच सर्वसामान्यांसाठीच्या आवश्यक सुविधांसाठीही संशोधन केले जाते. नुकतीच संसदीय समितीच्या अहवालामध्ये सांगण्यात आले की, ही भरती सेवानिवृत्त होणाऱ्या संशोधकांच्या होणाऱ्या रिक्त जागांव्यतीरिक्त होणार आहे.