मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने उद्रेक केल्याने ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसेच ९ वी आणि ११ वीच्या वर्गांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. शालेय विद्यार्थी आपणा सर्वांशी इयत्ता पहिली ते आठवीच्या वार्षिक मूल्यमापनाच्या संदर्भात संवाद साधण्यासाठी एक विशेष संदेश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसारित केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते.
राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. १ ली ते इ. ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करत आहेत. मात्र संकलित मूल्यमापन करता आलेले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
१ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील.