कानपूर: कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर येत आहे. कानपूर येथे एका लसीकरण केंद्रात लस देणारी नर्स मोबाइलवर बोलण्यात इतकी गुंग होती की, तिने बोलता बोलता एका महिलेला दोनवेळा लस दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, गेल्या २४ तासांत ८९ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येत आहे.
कानपूरच्या मडौली येथे लसीकरण केंद्रावर कमलेश देवी नावाची महिला लस घेण्यासाठी गेली असता तेथील लस देणारी महिला मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्या नर्सने महिलेला तिला दोन वेळा लस टोचली, महिलेने नर्सला सांगितल्यानंतर तिने चूक कबूल केली. कमलेश देवी म्हणाली, नर्स मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. फोनवर बोलता बोलता मला लस टोचली. मला तिथे उठण्यास सांगितले नाही. त्यामुळे मी त्याच ठिकाणी बसले होते. फोनवर बोलताना त्या नर्सच्या लक्षात आले नाही की, मला पहिला डोस दिला आहे. त्यानंतर दुसऱ्यादा तिने मला लस टोचली, दोन वेळा लस का दिली, असे विचारले असता तुम्ही उठून का गेला नाही? असे विचारले. त्यानंतर वादावादी झाली आणि नातेवाईकांनी गोंधळ घातला. संबधित महिलेची तब्येत बरी असून तिचा हात सुजला आहे. नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर संबधित नर्सवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ थांबला.