महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने सात-बारा उताऱ्यात काही बदल केले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय २ सप्टेंबर २०२० ला प्रसिद्ध करण्यात आला.
जमीन अधिनियम कायद्यानुसार तलाठी दप्तराचे २१ प्रकारचे नमुने असतात. यात दोन प्रकार आहेत. कलम ७ आणि कलम १२ असतात. कलम ७ मध्ये मालकी हक्क, गट क्रमांक, एकूण किती क्षेत्र आहे याचा उल्लेख असतो. याचबरोबरही इतर हक्क, शेताचे नाव, भोगवटदाराचे नाव, कुळ असेल तर त्याचे नाव, लागवडीखालील क्षेत्र, पोटखराबी, जिरायती-बागायती, असे उल्लेख त्यात असतात. तर गाव नमुना-१२ मध्ये या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते. यालाच पीक पाणी असे ग्रामीण भागात बोलले जाते.
११ नवीन बदल करत सरकारने सुधारीत सात-बारा उताऱ्यास मान्यता दिली. त्यानुसार गाव नमुना सातमध्ये ११ बदल केले आहेत.
१) गाव नमुना सातमध्ये गावाचे नाव याचबरोबर गावाचा कोड टाकण्यात आला आहे.
२) एखाद्या शेतकऱ्यांचे लागवडीखालील क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्र दाखवून त्यांची बेरीज करून एकूण क्षेत्र नोंदवण्यात आले आहे.
३) शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात आले आहे.
४) यापुर्वी शेतकऱ्यांचे खाते क्रमांक हे इतर हक्कात नोंद केले जायचे. सध्या नव्या नियमानुसार खातेदाराच्या नावासमोर मांडण्यात आली आहे.
५) खातेदार मयत झाल्यावर त्यास कंस देत वारसाचे नाव चढवले जायचे. याचबरोबर कर्जाचे बोजे ही त्या खातेदाराच्या नावासमोर कंसात दिले जायचे. नव्या नियमानुसार मयत खातेदाराच्या नावावर कंस करत आडवी रेष मारून नावाचा उल्लेख नष्ट करण्यात आली आहे.
६) जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात आली आहे.
७) गाव नमुना-7 मध्ये यापुर्वी सर्व जुने फेरफार क्रमांक बदलण्यात आले आहेत ते सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात आली आहे.
८) गट नंबर एकच असेल आणि दोन खातेदार असतील तर खातेदारांची सलग नावे असायची त्यामुळे नावांचा घोळ होत होता तो दूर करून नव्या नियामानुसार दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात आली आहे. जेणेकरूण खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसतील.
९) गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आली आहे.
१०) बिगरशेतीच्या सातबारा उताऱ्यावरील शेतजमिनीचे एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळले आहेत.
११) बिगरशेतीच्या सात-बारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-१२ची आवश्यकता नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सात-बारा जनतेला उपलब्ध करून देण्याच्या हेतुने सात-बारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नवीन सात-बाऱ्याच्या माध्यमातून अधिक माहितीपूर्ण सात-बारा जनतेला उपलब्ध झाल्याने आणि महसूल विभागाच्या कामकाजात अडथळे दूर झाल्याने अचूकता आणि गतिमानता आली आहे.