पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंकिंगसाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत बुधवारी संपत आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर आर्थिक व्यवहार अडचणीत येण्यासह मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाने 2019 मध्ये आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची योजना पहिल्यांदा लागू केली. त्यानंतर या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली; मात्र आता नवीन मुदत देण्यात येणार नसून, 31 मार्च 2021 हीच अंतिम मुदत राहील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
लिंकिंग झाले नसेल, तर…
– पॅन कार्ड-आधार क्रमांक लिंक नसेल, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय बनू शकते. अशा पॅन कार्डसाठी दंडात्मक तरतूद आहे.
– एखाद्या व्यक्तीने मुदतीत पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करून घेतले नसेल, तर पॅन कार्डच्या आधारे केल्या जाणार्या व्यवहारांवर 20 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो.
– पॅन कार्ड-आधार लिंकिंग नसेल, तर केंद्र सरकारने यापूर्वी 1,000 रुपये लेट फी लागू केली होती. मात्र, आता नव्या कलम 234 सी (आर्थिक विधेयक) अनुसार यासाठी 1,000 रुपये दंडही आकारला जाणार आहे. हा दंड स्वतंत्र असेल.
घसबसल्या करा लिंकिंग
पॅन कार्ड-आधार कार्ड लिंकिंगची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. याशिवाय विभागाने जारी केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर एसएमएस पाठवूनही तुम्ही लिंकिंग करू शकता.
असा पाठवा एसएमएस
तुम्हाला आधार क्रमांक-पॅन कार्ड लिंकिंग करायचे असेल, तर तुम्हाला आपल्या मोबाईल क्रमांकावरून UIDPAN असे लिहून त्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक तसेच 10 अंकी पॅन क्रमांक लिहून 567678 अथवा 561561 या क्रमांकावर पाठविणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेल्याचा मेसेज येईल.
लिंकिंगची ऑनलाइन सुविधा
इन्कम टॅक्स विभागाच्या https://incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर होम पेजवरच आधार-पॅन कार्ड लिंकिंगचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर आवश्यक माहिती भरल्यानंतर लिंकिंगचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.