अकोला : जिल्ह्याच्या तापमानात गत दोन दिवसांपासून अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी (ता. २८) विदर्भातील चंद्रपूर व ब्रह्मपुरीनंतर अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाच्या चटक्यांमुळे रविवारी जिल्ह्याच्या किमान तापमानाने ४१.५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा कहर जाणवला. विदर्भातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचे कमाल तापमान चाळीशीकडे आगेकूच करत होते. दरम्यान आता आकाश निरभ्र असल्याने सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे होळीच्या आधीच शनिवारी (ता. २७) जिल्ह्याचे कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. त्यानंतर रविवारी (ता. २८) सुद्धा जिल्ह्याचे तापमान ४१.५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. उन्हाच्या चटक्यांमुळे दिवसभर नागरिकांनी घरात पंख्याचा व घराबाहेर झाडाच्या सावलीचा आसरा घेतला.
————
तापदायक ठरणार उन्हाळा
जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने आगामी दिवस नागरिकांसाठी ‘तापदायक’ ठरतील. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केल्यामुळे आगामी दिवस नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके जाणवतील.
————–
असे आहे तापमान (अंश सेल्सियस)
जिल्ह्यात कमाल तापमान
चंद्रपूर ४२.४
ब्रह्मपूरी ४१.८
अकोला ४१.५
यवतमाळ ४१.२
वर्धा ४०.६
नागपूर ४०.२
वाशीम ३९.०
बुलढाणा ३९.०