बंगळुरूमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तब्बल सहा तास बेडखाली लपून राहिला. व्यवसायाने कारपेंटर असलेल्या भरत कुमारने ८ वर्षांआधी लग्न केलं होतं. ३१ वर्षीय भरतला पत्नीचं शिवराज नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय होता. यानंतर त्याने प्लॅन करून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.
शिवराज नावाच्या व्यक्तीचं भरतच्या पत्नीसोबत अफेअर सुरू होतं. बुधवारी रात्री भरत ९ वाजता दरम्यान घरी आला आणि रूममधील बेडखाली लपून राहिला. भरत आल्यानंतर जवळपास दीड तासाने शिवराजही त्याच्या घरी पोहोचला. शिवराज साधारण १०.३० वाजता घरी आला आणि त्याच बेडवर झोपला ज्याखाली भरत लपलेला होता.
भरत त्यानंतरही तेथून बाहेर आला नाही. रात्री साधारण २ ते ३ वाजता त्याची पत्नी बाथरूमला गेली. तेव्हा भरत बाहेर आला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर शिवराजवर चाकूने हल्ला केला. शिवराजचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी भरतला अटक केली आहे.
दरम्यान, भरतने आठ वर्षाआधी लग्न केलं होतं. शिवराज आणि भरतची पत्नी एकेकाळी मित्र होते. शिवराजने भरतच्या पत्नीला प्रपोजही केलं होतं. पण भरतच्या पत्नीने त्याला नकार दिला होता. पण शिवराजच्या सतत प्रयत्नांनंतर भरतच्या पत्नीने सीक्रेट अफेअरसाठी होकार दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, भरत कुमारने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याची मेडिकल टेस्ट केली जात आहे.