मुंबई (योगेश नायकवाडे)आपल्या विविध मागण्यासाठी मागील 9 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या संगणकपरिचालकांचे प्रश्न न सोडवता त्यांना आझाद मैदानावरून पोलिसांच्या माध्यमातून शासनाने बळाचा वापर करून आंदोलकांना मैदान सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी अनेक आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला असून प्रश्न सुटे पर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्णय आंदोलन सुरू होण्या अगोदर झाल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
याबाबत मागील 10 वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर 22 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला 9 दिवस होऊन सुद्धा शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याने संगणकपरिचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यामुळे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर काही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना व्हॅन मध्ये बसवून आझाद मैदानात आणले व काहींना इतरत्र ताब्यात घेतले.एकीकडे मंत्री ना.हसन मुश्रीफ व किंवा मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी भेट द्यायची नाही व प्रश्न सोडवायचा नाही तर दुसरीकडे काहीच न घेता आंदोलकांना मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी पोलिसांचा वापर करायचा यामुळे संगणकपरिचालकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून संगणकपरिचालकांवर वारंवार अन्याय झालेला असल्यामुळे शासन मागणी मान्य करे पर्यन्त कुणीही मुंबई सोडणार नसल्याचा निर्णय आंदोलन सुरू करण्या अगोदर राज्यातील सर्व संगणकपरिचालकांनी घेतल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
पोलिसांनी केला बळाचा वापर!
मागील 9 दिवसापासून रात्रंदिवस चालणारे आंदोलन काहीच न देता प्रश्न न सोडवता गुंडाळन्यासाठी शासनाने पोलीस प्रशासनाचा वापर केला . 2 मार्च ला रात्री 11.30 च्या दरम्यान पोलीस प्रशासनाने राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना जबरदस्ती ताब्यात घेतले व नंतर बळाचा वापर करून सर्व संगणकपरिचालकांना हुसकावून लावले, त्यात अनेकांवर लाठीचार्ज केला असल्याचे समजते,यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना अशा प्रकारे केलेल्या वाईट वागणुकीचा राज्यात सर्व स्तरातून निषेध होत आहे.
मुंबई न सोडण्यावर संगणकपरिचालक ठाम !
पोलीस प्रशासनाने रात्री आझाद मैदानाच्या बाहेर काढले असले तरी आज 3 मार्च रोजी संगणकपरिचालक मुंबई सोडत नसल्याचे दिसून आले 34 जिल्ह्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईच्या आझाद मैदान,विधानभवन,मंत्रालय परिसर,सी एस टी,चर्चगेट व इतर ठिकाणी दिसून आले.
सिद्धेश्वर मुंडेंना घेतले परत ताब्यात!
पोलिसांनी काल रात्री आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न केले परंतु मुंबई येथील संगणकपरिचालकांनी आज 3 मार्च ला आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानासमोर गर्दी केली होती त्यावेळी आझाद मैदान गेट वर आलेले संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परंतु आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.










