हिवरखेड : स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत धोंडा आखर येथे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, महसूल विभागाच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने गावातील नागरिक जमवून तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवार, १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. धोंडा आखर परिसरात रेतीची अवैध वाहतूक वाढली आहे. याबाबत माहिती मिळाल्याने तलाठी किशोर गायकी, सतीश दांडगे हे बुधवारी धोंडा आखर येथे गेले असता त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गावातील जमाव जमवून तलाठ्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील काही नागरिकांनी तलाठ्यांवर हल्ला केला, अशा आशयाची तक्रार तलाठी किशोर गायकी यांनी हिरवखेड पोलिसांना दिली. या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी तहसीलदार राजेश गुरुव व ठाणेदार धीरज चव्हाण यांनी भेट दिली.