अकोला(दीपक गवई)– वित्तीय सेवेसमवेतच समाजाच्या सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या दि अकोला अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने महानगरात उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नवउद्योजक निर्मितीच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम दि अकोला अर्बन को-ऑप.बँक लि. अकोला व केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद दशपुते यांनी दिली. बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बँकेच्या वतीने आयोजित ग्राहक मेळावा व उद्योजकता कार्यशाळेची सविस्तर माहिती दिली. शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी दु.2 वा.गोरक्षण मार्गावरील शुभमंगल सभागृहात ही उद्योजगता कार्यशाळा व ग्राहक मेळावा होत असून या सोहळ्याचे उद्घाटन आ.रामदास आंबटकर यांच्या हस्ते होत असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे. पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार गोवर्धन शर्मा, आ.डॉ. रणजीत पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.नितीन देशमुख, आ.अमोल मिटकरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे संचालक प्रमोद पार्लेवार हे आपले व्याख्यान सादर करणार आहेत. अकोला अर्बन बँकेने रोजगारभिमुख नागरिक घडविण्याचा हा अभिनव उपक्रम या माध्यमातून सुरु केला असून एमएसएमई योजने अंतर्गत छोटे व्यवसायिक, फळ आणि व्हेजिटेबल प्रक्रिया, स्टोन कटिंग पोलिसिंग, पापड उत्पादन, बेकरी प्रोडक्ट, सोने चांदी दागिने उत्पादन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑफिस प्रिंटिंग अँड बुक बाइंडिंग, जनरेटर उत्पादन, मशिनरी स्पेअर पार्ट, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफी, मोटर रिवाइंडिंग, फॅब्रिक उत्पादन, सलून, सजावट ब्लब उत्पादन, रुरल ट्रान्सपोर्ट सर्विसेस, सिल्क साडी उत्पादन, चटई बनविणे, ग्रामीण तेल घाणी उद्योग, काटेरी तारांचे उत्पादन आदी रोजगाराभिमुख उद्योग राबविण्यात येत असून हे उद्योग घडविण्यासाठी बँक कटिबद्ध असून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी ही संकल्पना बँकेच्या वतीने करून याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करून या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या उद्योजगता कार्यशाळेत अशा विविध विषयावर सांगोपांग मार्गदर्शन मिळणार असून रोजगार घडविण्यासाठी हीकार्यशाळा लाभदायक ठरून मानव संसाधन निर्माण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी बँकेच्या वतीने साकारलेल्या या उद्योजकता कार्यशाळेत व ग्राहक मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा उपक्रम बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, सचिव हरीशभाई लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात साकार करण्यात येत असून यासाठी बँकेचे समस्त संचालक मंडळ, विनोद अग्रवाल, समीर थोडगे, ललित केजडीवाल यांच्यासह अधिकारी वर्ग व कर्मचारी वृंद परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.