अकोट(शिवा मगर)- अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी नुकतेच एक अनोखे आंदोलन करीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाहुरवाघ यांना एक-एक रक्ताच्या बॉटल्ससह आपल्या गत काही वर्षांपासून असलेल्या मागण्यांसाठी निवेदन देऊन नगर परिषद प्रशासन तसेच शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या निवेदनामध्ये सफाई कामगार व त्यांच्या परीवाराकरीता शासनाच्या लाड व पागे समितीचा निर्णय व शिफारस लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोट नगरपरीषद मध्ये सफाई कामगारांनी यापूर्वी आमरण उपोषण सुद्धा पुकारले होते त्यांनी नगरपरिषद प्रशासन व शासनाकडे सफाई कामगारांचे करिता असलेल्या विविध योजना तसेच करण्यात आलेल्या शिफारशी नुसार वाल्मिकी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, उन्नती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना,7 वा वेतन आयोग, तसेच संवर्धन व विकास होण्याकरिता सुचविण्यात आलेल्या बाबींचे अंमलबजावणी करणेबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांना केवळ आश्वासनच मिळत गेले आहे या आश्वासनाची परिपूर्तता होत नसल्याने अखेर सफाई कामगारांनी अकोट नगरपरीषदचे मुख्याधिकारी वाहुरवाघ यांना एक – एक रक्ताची बॉटल्स अशा 12 रक्ताच्या बॉटल्ससह पून्हा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय सफाई मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष राधेश्याम मर्दाने,प्रमोद मोगरे,प्रमोद मर्दाने,गिरीश माहातो, मुकेश छापरवाल,राहुल सत्याल, लखन बागळे,रतन चरेरे, कुंदन मर्दाने,कुनाल मर्दाने,पाचुराम चावरे,शुभम हाथेकर व आदी सफाई कामगारांनी निवेदन दिले असून सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.