अकोला – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अद्याप ३२५७ शेतकरी आधार प्रमाणीकरण न झाल्याने वंचित आहेत. येत्या दहा दिवसांत या लोकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
दि.१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा उपनिबंधक कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जी.एस.पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, महात्मा जोतिराव फुले योजनेसाठी जिल्ह्यातून एक लाख १४ हजार ९५९ शेतकरी खातेदारांची माहिती अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी एक लाख चार हजार५२४ खातेदारांचा विशिष्ट क्रमांक मिळून पात्र ठरले. त्यातील एक लाख एक हजार २६७ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले. तर ३२५७ जणांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण बाकी आहे. प्रमाणिकरण झाल्यापैकी काही तक्रारींचे प्रकरणे वगळता ९८ हजार ८५७ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम एकूण ६२० कोटी रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
आधार प्रमाणिकरणासाठी वारंवार आवाहन करूनही लोक पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे, तेव्हा आता येत्या दहा दिवसांत या लोकांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. ते प्रत्यक्ष गावात आहेत की नाही, बाहेर गावी आहेत किंवा रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत का याबाबतची माहिती घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. यापूर्वीच्या छत्रपती शेतकरी सन्मान योजनेच्या लाभबाबत काही शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यास त्यांनी तालुका निबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.