हिवरखेड (अब्दुल साकिब) :- विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव ग्रामपंचायतचा धक्कादायक निकाल लागला आहे. येथील मतदारांनी परिवर्तनाच्या हेतूने नवीन युवा सदस्यांना पसंती दिली असून, 17 पैकी 15 नवीन सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत.मागील पाच वर्षासाठी निवडणूक आलेल्या 17 सदस्यांपैकी 9 सदस्य पुन्हा यावेळी स्वतः उभे होते तर एखादा अपवाद वगळता इतर सर्व सदस्यांच्या घरचे जवळचे नातेवाईक निवडणुकीत उभे होते. परंतु मतदारांनी मागील सदस्यांमधून फक्त नसरीन खातून या एकाच महिला सदस्याला पुन्हा निवडून दिले.इतर सर्व नवीन सदस्य निवडून दिले. सुनंदा सुरेश गिर्हे यांना सर्वाधिक 1034 मते मिळाली. तर सर्वात युवा म्हणून 22 वर्षीय आचल सुरेश ओंकारे ही युवती निवडून आली.हिवरखेड ग्रामपंचायत निकालाकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते.येथील वार्ड क्रमांक दोनमध्ये आमदारकीचे 2 तगडे दावेदार श्यामशील भोपळे आणि रमेश दुतोंडे यांच्यात सरळ लढत झाली. ज्यामध्ये रमेश दुतोंडे विजयी झाले. गिर्हे, भोपळे, ओंकारे, मिरसाहेब प्रणित जयकिसान मित्र शक्ती पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले. ‘प्रहार’चे 5 उमेदवार निवडून आले. तर दुतोंडे जमीर खाँ पठाण गटाचे चार सदस्य निवडून आले.सुनील इंगळे हे शेतकरी पॅनलमधून निवडून आले. ‘प्रहार’ने मजल मारीत 5 सदस्य निवडून आणल्याने ‘प्रहार’ च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता जवळपास सर्वच सदस्य नवीन निवडून आल्यामुळे हिवरखेड वासियांना झपाट्याने विकास होईल अशी आशा अपेक्षा लागली आहे. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे आता नवीन सरपंच पदाचे आरक्षण काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हिवरखेड चा नवीन सरपंच कोण ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोणत्याही एका गटाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने आता कोणाची युती होते आणि कोणत्या गटाचा सरपंच होतो याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.