अकोला – कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध उत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी रद्द केले.
यानुसार पुणे येथे दरवर्षी 1 जानेवारीला आयोजित होणारी 1 जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिवस महारॅली यंदाच्या वर्षी आयोजकांना स्थगित करावी लागली व प्रातिनिधिक स्वरूपात स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करावे तसेच महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यानी त्यांच्या स्थानिक ठिकाणी कोविड 19 च्या नियमाच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन श्री.संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे अकोला जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे. दि.1 जानेवारी 1848 रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती.
या दिवसाचे व कार्यांचे औचित्य साधून दरवर्षी ही महारॅली आयोजित करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी ही रॅली स्थगित करण्यात आली आहे. म्हणून अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी गावागावात कोविड 19 च्या नियमांच्या अधीन राहून 1 जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन ते 3 जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन (महिला शिक्षक दिन) त्रिदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच आपल्या घरासमोर रांगोळी काढावी व शक्य असल्यास घरावर रोषणाई करावी. मुख्य चौकात डिजिटल बॅनर लावून फुले दाम्पत्य सन्मान दिनाच्या शुभेच्छा द्याव्या, मुख्य चौकात मिठाई वाटप करावे . या शिवाय आपल्याला सुचेल असे अभिनव उपक्रम राबवावे. अशा प्रकारे विविध उपक्रम मार्फत हा उत्सव साजरा करावा असे आवाहन संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष अजयदादा बंड यांनी केले आहे.