लासलगाव : तब्बल १०५ दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार आहे. (Government of India, allows) १ जानेवारी २०२१ (1st January 2021) पासून कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. (export of all varieties of onions) या संबंधीची अधिसूचना केंद्रीय वाणीज्य मंत्रालयाने जारी केली आहे. उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात येत असताना देशांतर्गत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने सर्वसाधारण कांद्याचे भाव हे दोन हजार रुपयांच्या आत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले असताना केंद्र सरकारने तब्बल १०५ दिवसांनंतर निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत, कांदा उत्पादकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. याबाबत डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड चे संचालक अमित यादव यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
सप्टेंबर महिन्यापासून कांद्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारने तातडीने भाववाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप करत १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदी लादली होती. त्यानंतर लासलगाव येथील १० व पिंपळगाव बसवंत येथील १ कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून तपासणी केली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी घाऊक व्यापाऱ्यांना पंचवीस तर किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टन कांदा साठवणुकीची मर्यादा टाकली. मात्र कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात येत नसल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तान, इजिप्त, इराण, अफगाणिस्तान या देशातून कांदा आयात करून भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या मिळणाऱ्या दरामध्ये कांदा उत्पादकांना झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला होता. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यात बंदी हटणार असल्याने नवीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भेट मिळाली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी चा निर्णय मागे घेतला या निर्णयाचे कांदा निर्यात दार असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो. या मुळे शेतकरी, व्यापारी या दोन्ही घटकांना याचा फायदा होणार असुन कांद्याच्या दरातील घसरण थांबेल, या मुळे कांद्याला स्थिर भाव मिळेल, यातुन परकीय गंगाजळी मिळणार आहे,
मनोज जैन…(कांदा निर्यातदार, लासलगांव)
कांदा निर्यात खुली केल्याने बाजार समितीच्या वतीने स्वागत आहे. कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कोसळत्या कांद्याच्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निमित्ताने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची भेटच म्हणावी लागेल. यामुळे कांदा भावात निश्चित वाढ होऊन शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल
सुवर्णा जगताप….सभापती, लासलगांव बाजार समिती
कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने तब्बल एक महिना उशिराने घेतला आहे. हा निर्णय अगोदर घेतला असता तर कांदा उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला नसता. मात्र उशीराने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
निवृत्ती न्याहारकर, शेतकरी