हिवरखेड (धीरज बजाज)-वीस वर्षां पासून प्रलंबित असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतीला नगरपंचायत अथवा नगरपरिषद करण्याचा मुद्दा थेट विधानपरिषदेत गाजला आहे. आ. अमोल मिटकरींनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज बुलंद करताना अकोला जिल्ह्यातील अनेक मागण्या रेटून धरल्या ज्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येचा विचार करता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतला तात्काळ नगर परिषद अथवा नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली. वीस वर्षांपासून हिवरखेडचे नागरिक यासाठी संघर्षरत आहेत. अनेक मोठ्या लोकप्रतीनिधींनी जनतेला फक्त गाजर दाखवुन मते मागीतली पण मागणी कोणीच पूर्ण केली नाही. यासाठी माजी राज्यमंत्री रामदासजी बोडखे हे त्यावेळी प्रयत्नरत होते पण अंतर्गत राजकारणामुळे मुद्दा प्रलंबीतच राहिला. 20 वर्षांपूर्वी प्रथम महिला सरपंच सौ इंदिराताई इंगळे यांच्या कार्यकाळात ठराव घेऊन या मागणीने जोर धरला होता. नंतर माजी सरपंच रामेश्वर शिंगणे यांनी या मुद्यावर उपोषण सुद्धा केले होते. पण शासनाने खोटे लिखित आश्वासन देऊन फसवणूक केली.
मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, अनेक संघटना आणि अनेक जागरूक आणि विकासप्रेमी नागरिकांनी यासाठी अविरत आणि निरंतर पाठपुरावा सुरु ठेवला आहे. आमदार झाल्यावर मिटकरी यांनी हिवरखेड दौऱ्यात सर्वप्रथम संतोष बजाज यांच्या निवासस्थानी भेट दिली असता तत्कालीन सरपंच सौ. अरुणाताई ओंकारे, यांनी ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल,सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, माजी सरपंच संदीप इंगळे, सुरेश ओंकारे, महेंद्र कराळे, विशाल बोरे, डॉ निलेश वानखडे, श्याम राऊत, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, सूरज चौबे, उमर मिर्झा, राहुल गिर्हे, जावेद खान, अनिल कवळकार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव सादर केला होता. याप्रसंगी आ मिटकरींनी हिवरखेड नगरपंचायतसह सर्व मुद्दे मार्गी लावण्याचे वचन उपस्थितांना दिले होते. त्याची जाण ठेवत त्यांनी आता या विषयाला थेट विधानपरिषदेत वाचा फोडली आहे. यासह अकोला जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर आमदार अमोल मिटकरी यांनी पुरवणी मागण्यांमध्ये मागण्या सादर केल्या आहेत. आता शासनाने त्वरित निर्णय घेऊन या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करीत आहे.
तहसीलदारांनीही अहवाल पाठविला
अनेक ठराव आणि सहपत्रांसहित हिवरखेड येथून नगरपंचायतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर त्यामध्ये काही छोट्या त्रुटी राहिल्या होत्या. ज्यामध्ये तहसीलदारांचा अहवाल येणे बाकी होता. यासाठी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्यासह जागरूक नागरिकांचा पाठपुरावा सुरूच होता. प्र. तहसीलदार राजेश गुरव आणि नायब तहसीलदार सुरळकर, गिल्ले इत्यादींनी पुढाकार घेऊन तहसील कार्यालयाचा परिपूर्ण, सविस्तर, वास्तविक, आणि सकारात्मक अहवाल मा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांना पाठविला आहे. त्यामुळे लवकरच हा विषय पूर्णत्वास पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत.