पंढरपूर : कार्तिकी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्यामुळे भाविकांनी यात्रेला पंढरपुरात येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. याकरिता 25 व 26 नोव्हेंबर रोजी दोन दिवस पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी, तर 22 ते 26 नोव्हेंबरपर्यंत एस.टी. बससेवा पूर्णत: बंद ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
कार्तिकी यात्रा सोहळा नियोजन आढावा बैठकीदरम्यान शुक्रवारी दुपारी चार वाजता पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले होते. मात्र कार्तिक वारीनिमित्त होणार्या सोहळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरात लक्षणीय गर्दी होण्याची शक्यता असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती यामधून व्यक्त केली होती. राज्य शासनाने दर्शनासाठी मंदिरे खुली केली असली तरी यात्रा व जत्रा भरविण्यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पंढरपुरात कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये तसेच वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीवर कोरोनाचे सावट असणार आहे.
कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 26 रोजी साजरा होत आहे. यात्रेला येणार्या भाविकांची लाखोंची संख्या विचारात घेता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने पोलिस प्रशासनाने पंढरपूर शहरात व परिसरातील 10 गावात 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते 26 रोजी रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात यावी तसेच 22 ते 26 यादरम्यान पंढरपूरकडे येणारी व पंढरपूरहून जाणारी बससेवादेखील बंद ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. वारकरी प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांच्या मागण्यांविषयी शासन स्तरावर लवकरच तोडगा काढला जाईल. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशानुसार कोणीही वारकरी, दिंड्यांनी पंढरपूरला येऊ नये. इतर जिल्ह्यांतूनही दिंड्या, पालख्या अथवा भाविक पंढरपूरला येणार नाहीत याची खबरदारी त्या त्या जिल्हा प्रशासनावर राज्य प्रशासनाकडून सोपवण्यात आली असल्याचेही अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
आषाढी यात्राकालावधीतप्रमाणेचा कार्तिकी यात्राकाळात पंढरपुरात त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व शहरस्तरीय बंदोबस्त असणार आहे. याकरिता 1700 पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार, पो.नि. किरण अवचर, पो.नि. प्रशांत भस्मे आदी उपस्थित होतेे.
संचारबंदीच्या प्रस्तावाकडे लक्ष
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठलाच्या दर्शनास भाविकांना सोडण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असून मंदिर परिसरातील आर्थिक उलाढालही सुरू झाली आहे. यामुळे व्यापारी, भाविक समाधानी आहेत. पुन्हा ऐन कार्तिकी यात्रेत संचारबंदी लागू झाली तर पंढरीत शुकशुकाटच दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे संचारबंदीबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे वारकरी संघटना व सांप्रदायाचे लक्ष लागले आहे. शासनाच्या अंतिम निर्णयानंतरच वारकरी संघटना आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
सर्वच जिल्हाधिकारी यांना सूचना
येत्या 26 नोव्हेबर रोजी पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्ताने होणार्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून भाविक येतात तसेच पालख्या आणि दिंड्या पंढरपूरला येत असतात. मात्र यंदा राज्य शासनाने या सोहळ्यावर बंदी घातली असून राज्याचे विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु.प. साळुंखे यांनी त्यासंदर्भातील सूचना आणि आदेश राज्यातील संबंधित जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.