शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020
अमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक उमेदवारीचा फॉर्म भरणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती घोषणापत्राद्वारे वृत्तपत्रे व टीव्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा संबंधित उमेदवारांनी घोषणापत्रे प्रसिद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती दैनिकांत तसेच वृत्त वाहिन्यांवर जाहिरातीच्या स्वरुपात कमीत कमी तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवसापासून 4 दिवसाच्या आत म्हणजे 21 नोव्हेंबरपर्यंत, त्यानंतर 22 नोव्हेंबर ते व 25 नोव्हेंबरदरम्यान, त्याचप्रमाणे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाच्या नवव्या दिवसापासून ते निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. ही जाहीरात 3 वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असून, ती न केल्यास कारवाईची तरतूदही आयोगाने केली आहे.
उमेदवाराने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहिता, लोकप्रतिनिधीत्व कायदा, भारतीय दंडसंहिता व प्रचलित फौजदारी कायद्यांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.
प्रचार मजकूराचेही प्रमाणीकरण बंधनकारक
उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रचार करण्यापूर्वी प्रचारासाठी वापरावयाचा मजकूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावरील माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून व पडताळणी करूनच प्रचाराकरिता वापरण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव, पत्ता व प्रतींची संख्या दर्शविणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे.