अकोला,दि.२८ (जिमाका)- प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती माता व तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बनवलेली योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम गर्भवती मातांनी आपले आधार कार्ड बनवून घेणे व बॅंक खाते उघडणे आवश्यक आहे, ह्या दोन्ही बाबींची पूर्तता करुन मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुकाणू व संनियंत्रण समितीची आज सभा पार पडली. या सभेस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या सह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, सन २०१७ पासून ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ हा गरोदर व स्तनदा मातांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी देण्यात येतो. हा लाभ त्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा केला जातो. गरोदरपणात तसेच प्रसुतीदरम्यान व बाळाचे संगोपन करुन लसीकरण पूर्ण केल्यास मातेच्या बॅंक खात्यात अतिरिक्त एक हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मातृत्व लाभ म्हणून दिले जातात. या योजनेचा उद्देश गरोदरपणात, प्रसुतीदरम्यान व नंतर मातेला विश्रांती मिळावी म्हणून तिच्या बुडीत मजूरीचा लाभ दिला जातो. गर्भवती व स्तनदा मातांना योग्य पोषण तत्वे मिळण्यासाठी आर्थिक मदत मिळावी , माता व बालकांचा आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचा कल वाढावा, सुदृढ माता सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते म्हणून ही योजना राबविली जात आहे.
तेव्हा गरोदर महिलांनी आपल्या घरी येणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्याकडे योजनेचा फॉर्म भरुन द्यावा. आधार कार्ड व बॅंक खाते क्रमांक द्यावा. तसेच प्रसुतीनंतरचे लाभ मिळविण्यासाठी बाळाचा जन्म दाखला व बाळाचे सर्व लसीकरण पूर्ण करणेही आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा तीन वेगवेगळ्या टप्प्यात दिला जातो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
अकोला जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३३ हजार १६६ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ३० हजार २५५ लाभार्थ्यांना १३ कोटी ५४ लक्ष ४२ हजार रुपयांचा लाभ या मातांना देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार कार्ड व बॅंक खाते नसल्याने त्यांना लाभ वितरीत करता आला नाही, तरी या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले आधार कार्ड व बॅंक खाते काढून आपल्या गावातील वा वार्डातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविके कडे द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गरोदर मातांना आधार कार्ड व बॅंक खाते उघडणे सोईचे व्हावे यासाठी तालुकास्तरावर शिबिरे घेण्याबाबत प्रशासन नियोजन करत आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.