अकोला : गेली अनेक वर्षे वेगळ्या विदर्भाची चळवळ हाती घेऊन लढा देणारे माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12:30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरात डॉ. वंदनाताई ढोणे स्मृतिस्थळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. डॉक्टरकीसोबत त्यांनी राजकारणातही आपली एक ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर अकोट मतदार संघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वेगळ्या विदर्भाचा वसा हाती घेतला आणि गेली अनेक वर्ष वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी ते लढा देत होते.
डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. जिल्ह्यातही राष्ट्रवादीनी महत्त्वाचं नेतृत्व गमावलं. भाजप प्रवेशानंतर ढोणे यांना भाजपने प्रदेश कार्यकारणी सदस्य अकोला जिल्हा भाजपा सिंचन परिषदेचे संयोजक ही जवाबदारी दिली होती. ही जवाबदारी पार पाडत असताना रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. ढोणे यांच्या निधनाने वेगळा विदर्भ चळवळीने एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.