अकोला – जिल्ह्यात अनेक ठिकाणी वन्यप्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतीत शिरुन पिकांचे नुकसान करत असतात. परिणामी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज पालकमंत्री उद्यमी ग्राम योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपवनसंरक्षक विजय माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उदयकुमार नलवडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वारंवारता अधिक असणाऱ्या ठिकाणांची माहिती देण्यात आली. वन्य प्राणी हे अधिवास क्षेत्रातून शेतात येऊन पिके फस्त करतात किंवा रानडुकरे, रोही सारखी जनावरे पिके उध्वस्त करतात. त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना जसे कुंपण करणे, चर खोदणे आदी करण्याट याव्या. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी खारपाणमुक्त गाव प्रकल्प आराखड्याचा आढावा घेतला. तसेच राजनापूर खिणखीणी या दत्तक गावातील विकासकामांचाही आढावा घेतला.