नवी दिल्ली :
सर्वसामान्य भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला पैसा बँकेतचं ठेवतात. त्यांनी आपल्या कमाईतील एक मोठा वाटा टर्म डिपॉझिट्स आणि बचत खात्यांमध्ये जमा केला आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यामध्ये ३० जून पर्यंत, पंतप्रधान मोदी यांच्याकडे १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रूपयांची जंगम संपत्ती होती. त्यांच्याजवळ ३० जूनला ३१ हजार ४५० रूपयांची रोकड होती. मागील वर्षाच्या तुलनेत मोदींच्या जंगम संपत्तीमध्ये २६.२६ टक्के इतकी वाढ झाली आहे. या वाढीमध्ये त्यांच्या वेतनातील बचत आणि फिक्स्ड डिपॉझिट्समधून मिळालेल्या व्याजाची पुन्हा गुंतवणूक हे मुख्य कारण आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कुठे गुंतवला पैसा?
पंतप्रधान मोदी यांच्या बचत खात्यात ३० जून रोजी ३.३८ लाख रूपये होते. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या गांधीनगर शाखेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून ठेवली आहे. गेल्या वर्षी त्याचे मूल्य १ कोटी २७ लाख, ८१ हजार ५७४ रुपये इतकी होती. जी ३० जून २०२० पर्यंत वाढून १ कोटी ६० लाख २८ हजार ३९ इतकी झाली आहे. तसेच मोदी यांनी टॅक्स वाचवणाऱ्या ठिकाणी आपला पैसा गुंतवला आहे.
मोदी यांनी लाइफ इंन्शोरन्स व्यतिरिक्त नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट (NSCs) आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्समध्ये पैसा गुंतवला आहे. त्यांनी नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट (NSCs) मध्ये अधिक पैसा गुंतवला आहे. त्यांचा विम्याचा प्रिमीयम देखील कमी झाला आहे.
मोदी यांच्याकडे ८ लाख ४३ हजार १२४ रुपांचे NSCs आहेत, तर वीमा प्रीमियम १ लाख ५० हजार ९५७ रुपये इचका जातो. जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी २० हजार रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केला होता. हा अद्याप मॅच्युअर झालेला नाही.