अकोट(देवानंद खिरकर) – लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण ५२% असलेल्या ओबीसी समाजाची शेतकरी व शेतमजूर अशी साधारण पार्श्वभूमी आहे. मात्र, कृषी क्षेत्र कोलमडून गेल्याने ओबीसी समाज आज सर्वार्थाने उद्ध्वस्त झाला आहे. त्यासाठी या समाजाला संवैधानिक सुरक्षितता व शासकीय पाठबळाची अत्यंत मोठ्या प्रमाणात गरज असून, राज्य सरकारने विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या मुद्द्यावर चर्चा करून ‘ओबीसीं’च्या विविध मागण्या मान्य कराव्या,या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिले.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध शैक्षणिक व आर्थिक सवलती तसेच आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी ओबीसी समाजाच्या निश्चित आकडेवारी अभावी सातत्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी सह सर्व समाजाची जात निहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी, ही मागणी संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या अभ्यास गटाच्या माध्यमातून गेली वर्षभर ओबीसी समाजातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून राज्य सरकारला दिलेल्या निवेदनाद्वारे उपायही सुचविण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयम् व स्वाधार योजनेच्या धर्तीवर वार्षिक ४० हजार रुपये विद्यावेतन सुरू करावे.
राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रवेश शुल्क १००/- रूपयांपेक्षा अधिक नसावे.ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना व्यवसायासाठी ५० लक्ष रुपयांपर्यंत बिनव्याजी व विनातरण कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.
महाराष्ट्रातील एमआयडीसी तसेच महानगर पालिका,नगर पालिका क्षेत्रातील व्यावसायिक भूखंड व दुकान गाळे वितरणात ओबीसी कोटा निर्माण करून भरणा रक्कमेत सबसिडी लागू करावी.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर वसतिगृहे व प्रशिक्षण केंद्रे स्थापन करावे.राज्य सरकारच्या वतीने एससी व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व शासकीय योजना व उपक्रम ओबीसी समाजातील शेतकऱ्यांनाही सरसकट लागू करावे.भूमिहीन ओबीसी कुटुंबांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर करून कसण्यासाठी जमिनी द्याव्यात. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करावी.इत्यादी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना अकोट तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी या वेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष साहिल पाटील मेंढे, ता .अध्यक्ष गोपाल पाटील भांबुरकर,संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष अभिजित कोकाटे,अक्षय गायकवाड ,निखिल मेंढे ,कपिल गायकवाड ,विलास सावरकर , कीशोर रोकडे ,सौरभ कुकळे ,अंकेश गायगोले व विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.