अकोला | शहराची तहान भागविणार्या महान धरणात जोरदार पाऊसामुळे 94.44 टक्के जलसंचय झाला असल्याने काटेपूर्णा धरणाचे आठ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. यावेळी काटेपूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने काटेपूर्णा महान धरणांमध्ये 1140 मीटर 347.47 पॉईंट 94.44 इतका जलसाठा झाला आहे. अकोला व मुर्तीजापूर शहराची तहान भागविण्यासह सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या काटेपूर्णा महान धरणात यावर्षी जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरण भरले असल्याने पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास धरणाचे आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी धरणाचे चार दरवाजे उघडून १५० क्यूसेक विसर्ग करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठात अधिक वाढ होत होती. त्यामुळे महान धरणावरील अधिकारी व कर्मचारी आपले तळ ठोकून उपस्थित आहेत. सुधाकर पाटील, शंकर खरात, मनोज पाठक, हातोंडकर, पिंपळकर यांनी आज सकाळी धरणाचे 8 दरवाजे उघडून पाणी सोडले आहे. यावेळी धरणावरील सायरन वाजवून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.