मुंबई : राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (शुक्रवार) सांगितले की, सरकार डिसेंबर अखेर राज्य पोलीस दलात 12 हजार 538 पदांची भरती करणार आहे. राज्य सचिवालयात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वेट करून सांगितले की, मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे