तेल्हारा (प्रतिनिधि) – तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील दारू विकणाऱ्या दोघांवर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून त्यांना अटक केली.
तेल्हारा परिसरात अवैध धंदे चालू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली.तडीपार गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे उकळी बाजार येथे मंगेश लक्ष्मण अंभोरे, प्रकाश उर्फ दत्ता भोजने हे दोघे जण विना परवाना देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.तिथे धाड टाकली असता त्यांच्या कडून देशी दारूच्या १९४ क्वार्टर एकूण किंमत ११,६४० चा मुद्देमाल त्यांच्या कडून हस्तगत केला.
तसेच, तडीपार गुन्हेगारांच्या शोध मोहीम राबवत असतांना मिळालेल्या माहितीवरून, राणेगाव येथील तडीपार आरोपी उमेश समाधान कुकडे वय २८ वर्ष, याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्याला एक वर्षाकरिता अकोला जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार अ.बहाकर व त्यांच्या पथकाने केली.