अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभासाठी असलेली पूर्वीची 50 उपस्थितांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता लग्नसमारंभाला वधु-वरांसह 25 पेक्षा अधिक नागरिकांना उपस्थित राहता येणार नाही. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
या आदेशाचा भंग करणा-या वधू, वर पक्ष, तसेच मंगल कार्यालय संचालक आदींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता व इतर कायद्यांनुसार फौजदारी कारवाई, तसेच 25 हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. त्याशिवाय, असे मंगल कार्यालय सीलही करण्यात येणार आहे.
लग्नाखेरीज इतर सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांना (लग्नाचा वाढदिवस, वाढदिवस आदी) मान्यता नाही. लग्नसमारंभासाठी मान्यता देण्याचे अधिकार अमरावती शहरात पालिका आयुक्तांना, नगरपरिषदेच्या क्षेत्रात मुख्याधिका-यांना व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना देण्यात आले आहेत. परवानगीसाठी अर्ज देताना अपेक्षित उपस्थितांची यादी जोडणे आवश्यक आहे.
मंगल कार्यालयात थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था, जागेसह सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण, कर्मचा-यांना हातमोजे, मास्क, हँडवॉश, सॅनिटायझर, त्यांची वैद्यकीय तपासणी, उपस्थितांत सोशल डिस्टन्स ठेवणे, थुंकण्यास प्रतिबंध आदी जबाबदारी कार्यालय व्यवस्थापकाची असेल. गर्दी वाढत असल्याचे आढळल्यास कार्यालयचालकाने तत्काळ पोलीसांना कळवणे बंधनकारक आहे. कंटेनमेंट झोनपासून दोनशे मीटर अंतरातील सभागृहे बंद असतील.
लग्नाला उपस्थित राहणा-या सर्वांनी आरोग्यसेतू ॲपचा वापर बंधनकारक आहे.