तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम गाडेगाव मध्ये गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व ग्रंथ पठणाची सुरुवात भीमराव परघरमोल, व्याख्याते तथा बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारा अभ्यासक यांच्या हस्ते करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की ग्राम गाडेगाव येथील बौद्ध मंडळीने आपसात धम्मदान गोळा करून काही दिवसांपूर्वी आणलेली बुद्धमूर्ती मोठ्या थाटामाटात व उत्साहात तसेच शारीरिक अंतर पाळून बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तसेच आज आषाढ पौर्णिमा असल्यामुळे आजपासून धम्मातील वर्षावासाला सुरुवात होत असते. आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा तीन महिन्यांचा वर्षावासाचा कालावधी असतो. या काळामध्ये गावोगावी धम्मग्रंथांचे पठण होऊन मोठ्या प्रमाणात धम्म चर्चा घडून येत असते. म्हणून आजच धम्मग्रंथ पठणाची सुरुवात सुद्धा करण्यात आली. याप्रसंगी तेल्हारा येथील भीमराव परघरमोल, प्राध्यापक संजय हिवराळे (गटनेता पंचायत समिती तेल्हारा), संजय वानखेडे, परमेश्वर इंगळे, अरुण वानखडे, हरिश्चंद्र वानखडे, किसन वानखडे यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळातील पंचफुला वानखडे, वंदना वानखडे, कविता वानखडे, बेबीताई वानखडे, पूजा खंडेराव तथा गावकरी व तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.