मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाविद्यालयाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत घेण्यात आला.
यावेळी अव्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द (बीकॉम, बीएससी, बीए) करण्यात आल्या आहेत. तर मागील सत्रात उत्तीर्ण झालेल्या आणि पदवी हवी असलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पदवी देण्यात येईल असा निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लेखी लिहून दिल्यास त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरवून त्या घेतल्या जातील असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच ज्यांना सरासरी गुणांवर श्रेणीत सुधारणा करून हवी आहे, त्यांनीही पुन्हा परीक्षेसाठी लेखी देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
याचबरोबर राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या (वैद्यकीय, विधी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, अध्यापन शास्त्र) परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र निर्णयाला दिल्ली येथील अपेक्स बॉडीकडून मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर बॅकलॉग आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत येत्या २ ते ३ दिवसांत सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि अधिकारी यांची शासन स्तरावर बैठक घेऊन, विचार विनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे.