अकोला,दि.5– जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे यांना बाळापूर हायवे रोडवर रिधोरा नजीकच्या पेट्रोलपंपाजवळ अल्पवयीन मुलीस पळवून नेत असल्याची माहिती दि. २९ मे रोजी प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर व नितीन अहिर यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील नागरीकांशी संवाद साधुन माहिती घेतली. त्यात दोन अल्पवयीन बालिका रडत असल्याचे आढळून आले. त्यांना विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना एक ट्रक चालक जबरदस्तीने घेऊन जात आहे. अधिक चौकशी अंती माहिती मिळाली की, त्या मुली कल्याण मुंबई येथुन आपल्या मैत्रीणींसोबत सैलानी यात्रा करून अकोला येथे आल्या होत्या.
त्यानंतर लॉकडाऊन च्या काळापासुन त्या अकोला शहरात अकोट फैल येथेच एका कुटुंबात राहत होत्या. एके दिवशी मुलीच्या आईने कल्याण वरून मुलींना आणण्याकरीता एका ट्रकचालकाला 30 हजार रूपये दिले असल्याचे मुलीने सांगितले. तो ट्रकचालक दारूच्या नशेत होता. ट्रकचालकाने मुलीसोबत काही अश्लील चाळे केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने ट्रकचालक तेथुन पसार झाला. त्यानंतर मुलींना विश्वासात घेऊन माहिती गोळा केली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधीत पोलीस स्टेशनला संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे, बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवीताई कुळकर्णी यांनी तात्काळ सूत्रे हलवून दोन्ही अल्पवयीन मुलींना तात्पुरत्या स्वरूपात बालीकाश्रमामध्ये दाखल केले. या प्रकरणामध्ये रिधोराचे पोलीस पाटील देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सपकाळ तसेच बाळापूर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. सद्यस्थितीत अल्पवयीन बालीका ह्या बालीकाश्रमात दाखल असुन सुरक्षित ठेवण्यात आले. आता ह्या बालिकेला तिच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, तसेच परिस्थितीमुळे अल्पवयातच होणारे बालविवाह, बालकामगार, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके, बालकांनी अवैधरीत्या होत असलेली विक्री ही गंभीर बाब असुन यांना प्रतिबंध करण्यासाठी गावामध्ये अथवा परिसरामध्ये असे काही आढळल्यास नागरीकांनी पुढाकार घ्यावा. तसेच 1098 (चाईल्ड हेल्पलाईन), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती,जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचेशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती कार्यान्वित करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.