मुंबई/पुणे, 5 जून 2020: मानवी अधिवासाच्या परिसंस्थेत नगरवने विविध प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरी पर्यावरणाला सुशोभित करण्यापलीकडे जाऊन, हवामानावर प्रभाव, अर्थव्यवस्थेत योगदान, वन्यजीवांना आसरा आणि शहरवासीयांना मनोरंजन असे त्यांचे निरनिराळे उपयोग होतात.
अधिक वृक्षराजी असणाऱ्या शहरांमध्ये ध्वनी व अन्य प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी असते, असे जागतिक आर्थिक विचारमंच म्हणतो. वाढ पूर्ण झालेले एक झाड वर्षाला 150 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकते. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायूंपैकी, कार्बन डायऑक्साईड हा एक प्रमुख वायू आहे. प्रचंड बांधकामे असलेल्या शहरांमध्ये रस्ते व इमारतींच्या काँक्रीटवरून परिवर्तित होणाऱ्या उष्णता- प्रारणांमुळे, सभोवारच्या ग्रामीण भागापेक्षा त्या शहराचे तापमान वाढते. याला ‘उष्माद्वीप परिणाम’ असे म्हणतात. अशा शहरांमध्ये तापमान सौम्य राखण्यासाठी झाडांची मदत होते. अन्न आणि कृषी संघटनेने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार झाडे वातावरणातील सल्फर डायऑक्साईड आणि तरंगत्या प्रदूषक कणांचे प्रमाण कमी करतात, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात नाहीसा करतात आणि ऑक्सिजनची पातळी वाढवितात.
नगरवनांबद्दल अनेक देशांमध्ये सध्या जनजागृती होताना दिसत आहे. रिओ दे जानेरो आणि जोहान्सबर्गसारख्या शहरांमध्ये शहरातच मोठमोठी जंगले आहेत. भारतात अनेक शहरांमध्ये बागा व उद्याने आहेत, परंतु वने नाहीत.
यासंदर्भात पुण्यात वर्ष 2015-16 मध्ये एक उपक्रम सुरु झाला. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला हा उपक्रम म्हणजे नागरी क्षेत्रांना पुन्हा चैतन्य देण्याच्या प्रक्रियेतील एक यशस्वी उदाहरण ठरले आहे.
वारजे नगरवनात किंवा स्मृतिवनात आपले स्वागत..
देशातील पहिले नगरवन म्हणून आकाराला येण्यापूर्वी वारजे टेकडी म्हणजे महाराष्ट्राच्या वनविभागाच्या अखत्यारीतील एक उजाड जमीन होती. जसजसे शहर वाढत गेले, तसतशी त्यावर झोपडपट्ट्यांची व बांधकाम व्यावसायिकांची अतिक्रमणे होऊ लागली.
चार वर्षांपूर्वी येथे एक आगळावेगळा प्रयोग सुरु झाला. महाराष्ट्र वन विभागाने TERRE पॉलिसी नावाची एक सामाजिक संस्था, टाटा मोटर्स आणि पर्सिस्टन्ट फाउंडेशन यांच्या साथीने या उजाड टेकडीस हिरव्या वनात रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला विविध वनस्पतींची 8 फुटी रोपे लावली गेली. यामध्ये वड, पिंपळ, सोनचाफा, आपटा, कडु
चार वर्षात या प्रयत्नांचे फळ दिसू लागले. स्मृतिवनात आज 6,500 पेक्षा अधिक मोठी झाडे डौलाने उभी आहेत. काही झाडे तर 25-30 फूट उंच झाली आहेत. यावर्षी आणखी झाडे लावली जातील. आज वनस्पतींच्या 23 प्रजाती, पक्ष्यांच्या 29 प्रजाती, पुलपाखरांच्या 15 प्रजाती, सरपटणारे 10 तर 3 सस्तन प्रजातींचे प्राणी असणारे असे हे वन जैववैविध्याने समृद्ध झाले आहे. यामध्ये पाण्याच्या पाच टाक्या व दोन निरीक्षण मनोरेही बांधण्यात आले आहेत.
या नगरवनामुळे पर्यावरणाचा समतोल तर राखला जात आहेच, पण त्याचबरोबर पुणेकरांना व्यायामाच्या दृष्टीने सकाळ-संध्याकाळी चालण्यासाठी एक उत्तम जागाही निर्माण झाली आहे. स्मृतिवनाला जवळपास 1000- 1500 लोक दररोज भेट देतात. यावर्षीच्या जागतिक पर्यावरणदिनामित्त पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशातील 200 नगरपालिकांसाठी महत्त्वाकांक्षी असा नगरवन कार्यक्रम सुरु होत असतानाच, पुण्यातील या ‘वारजे नगरवनाने’ पूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.