अकोट(देवानंद खिरकर) : अकोट ग्रामीण रुग्णालय हे अकोट तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्यदायी सुविधा मिळावी यासाठी आहे. मात्र ग्रामीण रुग्णालय हे समस्यांच्या डोंगराखाली दबले आहे. या रुग्णालयावर कोरोना आपत्तीतही ग्रहण कायम आहे. सुमारे 60 पेक्षा जास्त खेड्यांसह सातपुड्यातील आदिवासी जनतेसाठी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. अकोट ग्रामीण रुग्णालयात मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर तोडक्या-मोडक्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत.
कोरोनासारख्या महामारीत अकोट ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. हा अनुशेष म्हणजे तुटक्या तलवारीने युद्ध लढण्यासाठी प्रकार ठरतो आहे. तेव्हा तालुक्यातील जनतेच्या आरोग्याबाबत होणारी ही हेळसांड व अनुशेषा बाबत जिल्हा प्रशासनासह शासनाने लक्ष घालावे अन तालुक्यातील जनतेला सुयोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने आपणास करत आहोत. शासनाने आपत्कालीन परिस्थिती असताना अकोट ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या अनुशेषाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी कष्टकरी ग्रामीण मजूर यांसह सामान्य रुग्णांच्या रुग्ण सेवेकडे गंभीरतेने लक्ष देत या रुग्णालयातील अनुपलब्ध सुविधांसाठी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा अनुशेष तात्काळ भरून अकोट तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा; अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर निवेदन हे माजी मनसे शहर अध्यक्ष नरेश हिरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मनविसे शहर अध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात शुभम देशपांडे, आशिष गवई ,अक्षय रोही, किरण इंगळे, संतोष भावे, तेजस लेंघे यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांना दिले. सदर माहिती मनविसे प्रसिध्द प्रमुख अजय शर्मा यांनी दिले .