हिवरखेड(धिरज बजाज)- हिवरखेड नजीकच्या चितलवाडी येथे 15 मे रोजी अन्न पाण्याच्या शोधात असलेला बिबट विहिरीत पडला होता. रात्रीच्या अंधारात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बचाव करण्यासाठी 16 मे रोजी आकोट वन्यजीव विभागाचे पथक हजर झाले होते. अनेक तास प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बचाव पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. सुरूवातीला पिंजरा लावून बिबट्याला खाद्य पुरविण्यात आले. परंतु त्यातही यश आले नाही नंतर विहिरीत शिडी ठेवण्यात आली. नंतर झाड ठेवण्यात आले. परंतु दोन दिवस भेदरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आणि मनुष्यबळ हजर असल्याची जाणीव असल्याने बिबट्याने बाहेर येण्याचे साहस केले नाही.
रात्री उशिरापर्यंत अतोनात प्रयत्न केल्यानंतर दमलेल्या बचाव पथकातील सदस्यांनी बिबट्याला एकांतवासाची जाणीव व्हावी आणि त्याच्यातील माणसांची भीती दूर व्हावी म्हणून रात्री उशिरा त्याच्यापासून मोठे अंतर ठेवत शांतता निर्माण केली. बिबट्याला सुरक्षेची जाणीव झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत शिडी आणि झाडाच्या सहाय्याने वर चढून त्याने “आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा” आणि “अच्छा तो हम चलते है” असे मनोमनी म्हणत आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे (सातपुडा पर्वत मेळघाटकडे) धूम ठोकली. परंतु अनेकांच्या मनात असलेला पुढचा प्रश्न फिर कहा मिलोगे ? ह्या प्रश्नाचे उत्तर “वही, जहा कोई आता जाता नही.” म्हणजेच सातपुड्यातील मेळघाटच्या घनदाट जंगलात आपण भेटू असेच जणू काही त्या बिबट्याला सांगायचे होते.
अशाप्रकारे बिबट्याचा सुखरूप रेस्क्यू संपन्न झाल्यामुळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना शासकीय अवकृपेने शेतात रात्री बेरात्री सिंचन, रखवालीसाठी जावे लागते, अशा भयंकर स्थिति मध्ये हिंसक वन्य जीवांसोबत काम करने म्हणजे हा शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार असुन शासनाचे आपराधिक कृत्य आहे, त्यामुळे पुढील होणारे अनर्थ टाळण्यासाठी वन विभागाने तात्काळ युद्ध पातळीवर घोषित वनक्षेत्र फेनसींग करावे, अन्यथा पुढील कायदेशीर आर्थिक नुकसान तसेच, फौजदारी प्रकरणाची संपुर्ण जबाबदारी वन विभाग व संबधित शासकीय विभागांची राहील.
राजकुमार भट्टड, प्रयोगशील शेतकरी.
शिडी व झाडाच्या सहाय्याने बिबट्याचे सुखरूप रेस्क्यू झाले. फेंसिंगचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे परंतु अत्यंत खर्चिक बाब असल्याने प्रस्ताव अजून प्रलंबित आहे. इच्छुक शेतकऱ्यांसाठी फेंसिंग योजना सुरू आहे.
विश्वनाथ चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी आकोट वन्यजीव विभाग