मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोहळा सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आणखी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकमत झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवावा, असे राज्य सरकारचे मत आहे. या चौथ्या लॉकडाऊनचा सामना करण्यासाठी काय रणनिती असावी आणि राज्याची आर्थिक घडी कशी रूळावर आणायची याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडीची बैठक गुरूवारी दुपारी पार पडली.