अकोला, दि.५ – अकोला जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना राज्यांतर्गतआपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्राप्त ऑनलाईन अर्ज प्रणालीवरुन आज दिवसअखेर ९७२ ई परवानग्या देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे परवानगीचे पत्रही संबंधितांना ऑनलाईनच उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामुळे कुणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकता भासली नाही, हे विशेष.
अकोला जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिली आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत ९७२ जणांना ई- परवानगी देण्यात आली. या संदर्भात जिल्हाप्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार हे समन्वय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. तर परराज्यात जाण्यासाठी उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे हे समन्वय अधिकारी आहेत.
या परवानगी देण्यासाठी जिल्हाप्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबवून प्राप्त १२८३ अर्जांमधून ९७२ जणांना परवानगी दिली आहे.
यासंदर्भात अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात वा देशातील अन्य राज्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://covid19.mhpolice.in/ या लिंक वर माहिती भरावी. (Upload Your Aadhar Card and Medical Certificate in Single file) वैद्यकीय तपासणी अहवाल लावणे अनिवार्य आहे. ही माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधण्यात येईल आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहीतीसाठी ०७२४-२४२४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार