मुंबई: लॉकडाऊनचे एका अर्थाने तिसरे पर्व सुरू झालेले आहे. देशभरात कोरोनाचे वाढणारे रुग्ण आणि निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता ४ मे ते १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी विभागणी राज्य सरकारने केली आहे. तसेच या तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यात काही सवलती राज्यसरकारने दिल्या आहेत. आत रेड झोनमधील कंटेन्मेंट झोन वगळता दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अधिक वाचा : लॉकडाऊन ३ मध्ये राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना
गगराणी म्हणाले, केंद्राच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुणे सारख्या रेड झोनमध्ये जे केंटेन्मेंट झोन आहेत ते वगळता मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह इतर काही वस्तू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये मद्यविक्रीचाही समावेश आहे. ही विक्री करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळवे लागणार आहेत. तसेच जी काही दुकाने सुरू करण्यात येणार आहेत, त्यामध्ये पाच दुकानांपेक्षा अधिक दुकाने एका लेनमध्ये नसणे आवश्यक आहे. याबाबतचे सर्व नियमन हे महापालिकांकडून करण्यात येणार आहे. कोणती दुकाने उघडायची, ती किती वेळ उघडायची याबाबतचे सर्व अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : जाणून घ्या ४ मेपासून कोणत्या झोनमध्ये काय सवलत
ते म्हणाले, कपडे, चपला, इलेक्ट्रॉनिक दुकाने व अन्य वस्तुंची दुकाने सुरु करता येणार आहेत. परंतु, सलून, स्पा, पार्लर अशी गर्दी होण्याच्या दुकानांवर अद्याप बंदी कायम ठेवण्यात आली आहे. परवानगी मिळालेल्या दुकानांमध्ये तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पाळणे, सॅनिटायझर वापरणे हे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक व बंधणकारक असणार आहे, असेही गगराणी यांनी यावेळी सांगितले.