अकोला,दि.२८ :कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. तथापि कोरोना विषाणू संसर्गित व्यक्ती हे बहुतांश प्रमाणात जुन्या आजारांनी ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांचेवर विशेष लक्ष ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना या साथरोगाचा फैलाव होऊ नये म्हणून ही उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय/खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या ६० वर्षे वयावरील आजारी व्यक्ती जुन्या आजाराने उदा. दमा, खोकला, अस्थमा, मधुमेह. न्युमोनिआ वा अन्य संसर्गजन्य आजार आहेत अशा व्यक्तींची यादी करावी. ही यादी शहरी भागांसाठी (महानगरपालिका क्षेत्रात) मनपाचे आरोग्य अधिकारी , नगरपरिषद क्षेत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामिण भागाकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद यांनी तयार करावी. त्यांनी अशा रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोरोना कक्ष यांच्याकडे द्यावी.
कोविड १९ या आजाराने संसर्गित नसलेले परंतू ज्यांना जुने आजार असल्याचा इतिहास आहे अशा रुग्णांची नियमित तपासणी करावी. जे रुग्ण अशा आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात येतील अशा रुग्णांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप डाऊनलोड करुन ते कार्यान्वित राहिल याबाबत दक्षता घ्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपापल्या अधिनस्त ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांचा कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करावा. त्यांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन नंबरही जाहीर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर