अकोट (प्रतिनिधी) : अकोट ग्रामीण रुग्णालयातील विविध मुद्यावरून अडचणीत सापडलेल्या तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिना शिवाल यांची अकोटातून बदली केल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. रेड्डी यांना वैद्यकीय अधिक्षिका पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर येथील कामात बदल होईल अशी नागिरकांना अपेक्षा होती. मात्र, रेड्डी 12 एप्रिलपासून कर्तव्यावर अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने अकोट ग्रामीण रुग्णालय सध्या वाऱ्यावर असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
आमदारांनी केली होती तक्रार
कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा राब-राब राबत आहे. अशातच अकोट ग्रामीण रुग्णालयावरही तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी आहे. तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका डॉ.मिना शिवाल यांच्या विविध तक्रारी झाल्याने माजी आमदार संजय गावंडे यांनी येथे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक देण्याची मागणी आरोग्य उपसंचालक डॉ. रियाज फारूकी यांच्याकडे केली होती. ज्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल. त्यांच्या मागणीची दखल घेत डॉ. शिवाल यांची अकोट येथून बदली केल्यानंतर येथील एमएस पदाची जबाबदारी डॉ. रेड्डी यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर येथील कामत बदल होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, रेड्डी देखील 12 एप्रिलपासून कर्तव्यावर अनुपस्थित असून, रुग्णालयाचा कारभार रामभरोसे असल्याचे पहायला मिळत आहे. करोना सारख्या महामारीच्या काळात एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने इतरांवर अतिरिक्त ताण पडतो. या बाबत लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.
रजा हवी 15 पासून अर्ज दिला 22 ला
डॉ. रेड्डी या 12 एप्रिलपासून कर्तव्यावर मुख्यालयी उपस्थित नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्या हजेरी पत्रकावर 12 एप्रिलपासून स्वाक्षरी नाही. त्यानंतर त्यांनी 15 एप्रिलपासून रजेवर जात असल्याचा अर्ज 22 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला येथे दिला आहे. त्यामुळे मागील तारखेला रजा पाहिजे असा अर्ज बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बऱ्याच जणांचे मत आहे.
डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका
कोरोना महामारीत डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली जात आहे. एकीकडे कर्तव्यदक्ष डॉक्टर दिसून येतात. तर दुसरीकडे कोरोनाच्या महत्त्वाच्या काळात कर्तव्यावर अनुपस्थित राहणाऱ्या डॉ. रेड्डी यांच्या सारखे वैद्यकीय अधिकारी दिसून येत असल्याने आश्चर्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.