अकोला- शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेला शेतमाल कोरोना संकटकाळात बाजारपेठेत उठाव नसल्याने वाया जाऊ नये तसेच त्याला योग्य भाव मिळावा तसेच ग्राहकाला चांगला भाजीपाला व फळे मिळावीत यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ‘शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात’ या उपक्रमाची सुरुवात आज अकोला शहरात करण्यात आली. या संकल्पनेतून स्वस्त धान्य दुकाने तसेच अन्य मोक्याच्या जागी शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ साखळी उभारण्याचा उपक्रम आज देशमुख फैल येथे सुरु करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच माजी उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांचे उपस्थितीत सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील ताजी, पौष्टिक व नैसर्गिक केळी, टरबूज, ताजा भाजीपाला असा शेतमाल मुद्दल भावात थेट पुरविण्यासाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने, किराणा दुकाने, तसेच मोक्याच्या शासकीय जागा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन, या ठिकाणी आऊटलेट्स निर्माण करण्यात येत आहेत. तेथे शेतमाल माफक किमतीत ग्राहकांना विक्री केला जातो.
या वेळी नरनाळा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, पणज ता अकोट या कंपनीशी संलग्न शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, प्रशासनातर्फे निर्माण करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वितरण साखळीतील दुकानदारांकडे, ग्राहकांना वितरीत करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. शेतकऱ्यांकडील माल ग्राहकांनी खरेदी करून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच्या या प्रयत्नात हातभार लावावा असे आवाहन डॉ. निलेश अपार यांनी केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून स्वस्त धान्य दुकानदार हजर होते.
अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात