अकोला- जिल्ह्यात आजही सर्व अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे, आज वीस अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सर्व निगेटीव्ह असून त्यात पातूर येथील सहा जणांच्या तिसऱ्या फेरतपासणीच्या अहवालांचा समावेश आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आजअखेर एकूण ४५५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४४३ अहवाल आले आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५९, फेरतपासणीचे ६९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २७ नमुने होते. आज वीस अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटीव्ह आले आहे. त्यात सहा हे पातूर येथील रुग्णांचे फेर तपासणीचे आहेत. ही त्यांची तिसरी फेरतपासणी होती. आजपर्यंत एकूण ४४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५० तर फेरतपासणीचे ६६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २७ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४२७ आहे.
जिल्ह्यात आजअखेर कोविडबाधीत संख्या १६ आहे त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटीव्ह आले असून फेरतपासणीतही पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मयत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंड असे तिघे जण आहेत.
आज सहा जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात १२ अहवाल प्रलंबित असून ते सर्व प्राथमिक अहवाल आहेत. सद्यस्थितीत ३३ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४८७ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १८२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण २९९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ३३ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.