अकोला- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गित दोन रुग्ण आढळल्याने सर्वच स्तरावरुन खबरदारीचे उपाय सुरु झाले आहेत. याच पार्श्वभुमिवर केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे. घरातच थांबावे, असे आवाहन ना. धोत्रे यांनी अकोला जिल्हावासीयांना केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेरानिया, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी ना. धोत्रे यांनी प्रशासनाने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. रुग्ण संख्या वाढल्यास त्यांना देखरेखीखाली व अलगीकरण, विलगीकरणात ठेवण्यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.