अकोला- राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला यांनी लॉकडाउनच्या काळात (दि.२१ मार्च ते ७ एप्रिल) अकोला जिल्ह्यात हातभट्टी, गावठी दारु निर्मीती व वाहतूक तसेच अवैध दारु विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी एकुण ३३ गुन्हे नोंदविले असून १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवाय दोन दुचाकी वाहने जप्त केली असुन दोन लाख ७८ हजार १९३ रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
मद्य व मद्यसेवन करण्याकरीता बहुतांश व्यक्ती दुकान, बार, रेस्टॉरंट या ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे कोरोना विषाणुचा फैलाव व प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच जिल्ह्यातील देशी विदेशी दारुची दुकाने, परमीट रुम बियर बार दि.२० मार्च पासून बंद करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील देशी विदेशी मद्य विक्री दुकाने सिल करण्यात आली आहेत.
या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांद्वारे तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील लॉकडाउनची परीस्थिती विचारात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्ह्यातील सर्व अवैध दारुचे अड्डे शोध घेऊन नष्ट करण्यात येत आहेत. तसेच पोलीसांसमवेत संयुक्त मोहीम राबवून गुन्हा अन्वेषणाचे काम व गस्त घेण्यात येत आहे. सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही अवैध दारु विक्रेत्याकडून दारु खरेदी करु नये तसेच अवैध मद्यविक्री वा निर्मीतीबाबत माहिती असल्यास ती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी केले आहे.
ऑनलाईन मद्यविक्रीला कोणतीही परवानगी नाही
अनेक जण ऑनलाईन मद्यविक्रीच्या फसव्या जाहीरातीच्या जाळ्यात अडकून स्वतःची फसवणूक करुन घेत आहेत. अशा प्रकारे ऑनलाईन मद्यविक्रीची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसून नागरिकांनी स्वतःची फसवणूक टाळावी,असे आवाहनही श्रीमती सराफ यांनी केले आहे.