अकोला- जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीतून शेतीसाठी लागणारी यंत्रे, त्यांचे सुटेभाग विक्रेते तसेच चहापत्ती उद्योग व विक्रेते (चहा स्टॉल नव्हे) यांना वगळण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जारी केले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५, साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २.३४४ व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १४ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार त्यांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सध्या अंमलात असलेल्या संचारबंदीतून कृषी यंत्रांची दुकाने, त्याचे सुटे भाग (पुरवठा साखळी सह) व दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील ट्रक दुरुस्तीची दुकाने, प्राधान्याने पेट्रोलपंप व डिझेलपंपा जवळील. तसेच चहापत्ती विक्रेते व उद्योग यांना वगळ्यात आले आहे.
या उद्योग व्यावसायिकांनी आपल्याकडील एकूण कर्मचाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवावे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालाची हाताळणी करणारे कर्मचारी / कामगार यांना मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर व इतर प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करुन देण्यात यावे,कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच त्यांचेमध्ये सुरक्षित अंतर राखण्यात यावे, मजूरांना अन्न व इतर आवश्यक साहीत्य सकाळी ११ ते दोन व सायंकाळी सहा ते आठ वा दरम्यान उपलब्ध करुन द्यावे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार- कर्मचारी हे एकत्र येवून काम करणार नाहीत व कामगार घरी जातांना एकत्रित जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा अटीही घालण्यात आल्या आहेत.